मुळ दैवत मांडवगड (म. प्र.) मंडू राजाची राजधानी. (जयवंत घराण्यातील देवीची माहिती सेन्ट्रल लायब्ररी सरकार दरबारी असलेल्या नोंदीनुसार दिलेली आहे याची नोंद घ्यावी.)
इ. स. १२९७ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी याने मांडवगड च्या राज्यावर स्वारी केली. यावेळी ४४ कुटुंबे स्थलांतरित झाली. यात ३५ कुटुंबे कायस्थ होती. त्यात कृपाशंकर नीलकंठ जयवंतही (गोत्र – अगस्ति) होते.
कुलस्वामिनी येडूबाई हिच्या रक्षणार्थ ते नाशिक जवळील वणीला सप्तशृंग देवीच्या स्थानी आले असता, येडूबाई हि माझी धाकटी बहिण कुमारिका असून तिची भिवंडी जवळ असलेल्या कारव्याच्या डोंगरातील गुहेत स्थापना करावी असा दृष्टांत झाला.
त्या आज्ञेनुसार यथासांग स्थापना केली. पडघा आणि आसपासच्या गावांची गावदेवी म्हणून प्रसिद्ध झाली. जयवंत घराण्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखू लागले.
इ. स. १९७२-७३ साली आपल्या देवीच्या ठिकाणाची माहिती श्रीमती वासंती अविनाश जयवंत, ठाणे यांना श्री रमेश कवठेकर, पडघा यांच्याकडून स्थानाची माहिती समजली, त्यानुसार सुनील कृष्णनाथ जयवंत, चेंबूर, जगन्नाथ भास्कर जयवंत, ठाणे, कमलाकर दत्तात्रय जयवंत, ठाणे अविनाश भा जयवंत, ठाणे, या सर्वांनी हे ठिकाण समक्ष पाहिले . तेथे झाडाखाली एका मोठ्या कातळावर शेंदूर चर्चित देवीचे स्वयंभू स्वरूप स्थानापन्न झालेले आढळून आले. लाकडी चौकटीवर विविध वस्तू अर्पण केलेल्या दिसत होत्या. हळद कुंकू वाहिलेले होते.
या दरम्यान अनेक जयवंत कुटुंबियांना दृष्टांत मिळाले कि मला सावली हवी. कारण मी उन्हात पोळ्त्येय, थंडीत कुडकुडत्येय व पावसात भिजत्येय. त्यामुळे मला सावली करून द्या. प्रत्यक्ष स्थानावर ज्या कातळावर देवीच्या मूर्ती होत्या, तो कातळ थंडगार होता. पण कातळाच्या आजूबाजूचा परिसर रखरखीत गरम होता, पाय भाजत होते. हे पाहिल्यावर सर्वांचे मन खिन्न झाले व तेथे मंदिर बांधण्याची प्रेरणा येडूआईने दिली.
दि. २८/७/१९७४ रोजी भालचंद्र त्रि जयवंत, दादर यांच्या घरी सर्व जयवंत कुटुंबाची सभा होऊन त्या सभेत मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ठराव झाला. ठराव झाल्यानंतर सभा घेऊन या सभेत सुनील जयवंत आणि इतर मंडळीनी, त्या भग्नावास्थेत असलेल्या स्थानाची माहिती जमलेल्या इतर मंडळीना दिली. प्रत्यक्ष तेथील परिस्थिती काय आहे, याची जाणीव करून दिली. आणि देवीच्या ठिकाणी जाण्याचे ठरले.
ठाणे – भिवंडी – पडघा – बोरीवली एस. टी ने जाऊन पुढे बैलगाडीने व काहीजण चालत देवीच्या ठिकाणी गेले. तेथे यथासांग पूजा अर्चा करून देवीकडे मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचा कौल घेतला. व नंतर बेड्यावर (गोठा) सर्वांनी स्वतः आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला.
सभा घेऊन त्या सभेमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, सभामंडप, पाण्याची कुपनलिका, विजेची सोय, शौचालय, रस्ता, हे प्रकल्प करण्याचे ठरले. तसेच समाजातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व बक्षिसे देण्याचे ठरले.
त्यासाठी रीतसर अनुमती मिळण्याकरिता फोरेस्ट ऑफिसर ठाणे यांना अर्ज सादर करण्यात आला.
या सभेमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी देणग्या गोळा करण्यात याव्यात, असे ठरले. तसेच एक संस्था स्थापन करण्यात यावी असे ठरले. संस्थेचे नाव “जयवंत स्नेहवर्धक मंडळ” असे ठरले व सर्वाना सभासद करून घेण्यात आले.
इ. स. १९७५ च्या चैत्री पंचमीच्या रात्री २।। वा. देवस्थानच्या जागी तेथे उत्सवाला आलेल्या परशुराम भगत व इतर भक्त मंडळीबरोबर सभा घेण्यात आली. त्यात मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सर्वानुमते मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले.
देवीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तमंडळी च्या विसाव्यासाठी, तसेच पावसाळ्यात स्थानिक आदिवासींना निवारा मिळावा म्हणून सभागृह बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार, पहिला सभामंडप गुढीपाडवा इ. स. १९९५ रोजी बांधून पूर्ण झाला. दुसरा सभामंडप डिसेंबर २००५ रोजी बांधून पूर्ण झाला.
दोन्ही सभामंडप झाल्यानंतर त्या ठिकाणी दरवर्षी “जयवंत स्नेहवर्धक मंडळा”तर्फे दर्शनाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी महानैवेद्य, पूजा, अर्चा करण्यात येते.
पुढे असे निदर्शनास आले कि गावकऱ्याचे, भक्ताचे व गुराढोराचे पाण्याविना हाल होतात. तेव्हा कुपनलिकेचे काम करावे असे ठरले. सदर कामासाठी तत्कालीन स्थानिक खासदार मा. चिंतामण वनगा आणि आमदार विष्णू सवरा यांच्याशी तीन वर्षे पाठपुरावा करण्यात आला. तेव्हा ग्राम पंचायत राहुर यांनी १७/०३/१९९९ रोजी ठराव पारित केला व नंतर मा. आमदारांनी त्यांच्या निधीतून कुपनलिका बांधली. खासदार मा. चिंतामण वनगा आणि आमदार विष्णू सवरा, यांच्या हस्ते कुपनलिकेचे उद्घाटन दि. २७/५/२००१ रोजी गावकऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले .