पूजा व उत्सव
दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी देवीच्या दर्शनासाठी मंडळातर्फे उत्सव साजरा करण्यात येतो. सर्वसाधारणपणे नवरात्रात पहिली सभा घेतली जाते. त्यात उत्सवाचा दिवस नक्की केला जातो. तशी सूचना सर्वाना दिली जाते. उत्सवाचा सर्व तपशील नक्की करून तसे पत्रक काढले जाते व दोन महिने आधी सर्वाना पोस्टाने किंवा email ने कळवले जाते.
देवीच्या दर्शनाच्या दिवशी सभामंडपात “जयवंत स्नेहवर्धक मंडळा”ची सभा घेण्यात येउन त्यामध्ये दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात सनदी लेखापालाकडून (C. A.) परीक्षित (audited) वार्षिक जमाखर्च व ताळेबंद (Balance Sheet) मंजूर करून घेण्यात येतो. सभेमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवाहन करून उर्वरित लागणाऱ्या खर्चाचा अंदाज देण्यात येतो.
यादिवशी देवीची गुरुजींकडून यथासांग पूजा, अभिषेक तथा आरती करण्यात येते. तीन दांपत्ये अभिषेकासाठी बसविण्यात येतात. आलेले भक्तगण देवीची खणा नारळाने ओटी भरतात. देवी कुमारिका असल्यामुळे तिला मंगळसूत्र अपर्ण करण्यात येत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. देवीला वरण पुरणाचा नैवेद्य दाखविण्यात येतो. नंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात येतो. प्रसाद वाटला जातो. साड्या, खण, नारळ यांची अल्प दरात विक्री करून साठलेली रक्कम मंडळाच्या निधीमध्ये जमा केली जाते. त्या रक्कमेचा उपयोग गावकऱ्याच्या सार्वजनिक उपक्रमासाठी केला जातो